Thursday, October 15, 2015

पुरस्कार !

परवाचीच गोष्ट! 

तिसरीतल्या माझ्या मुलीने छान कविता म्हणून दाखवली. अर्थात पाठय-पुस्तकातलीच होती! नंतर माझ्या दडपणाला बळी पडून 'माझा आवडता प्राणी' वर निबंधपण लिहिला.

निबंध यथातथाच होता. पण प्रोत्साहन म्हणून मी तिला छान म्हणालो. जवळ घेतल. पाच रूपयांच 'डेरी मिल्क' हातावर ठेवून गोड असा पापा घेतला. मग म्हणालो, "बेटा, यामध्ये अजुन सुधारणा हवी."
मी पुढे अजुन बोलणार हे तिने ओळखल व मला थांबवत म्हणाली, ओ पप्पा! मला तुम्ही हे चॉकलेट आणि ही पापी नका देत जाऊ प्लीज !! मला ना तुम्ही एखादा पुरस्कार वैगरेच द्या आणि हो..ह्या 5 रुपयांच्या चॉकलेट पेक्षा मला 5 रूपयेच द्या !!
मी एकदम अवाक् झालो. एवढिशी चिमुरडी ! काय बोलते आहे. माझ्या चेहऱ्यावरचे भाव आणि उघडे राहीलेले तोंड पाहून तीच पुढे म्हणाली," कस आहे न पप्पा, जेव्हा तुम्ही माझ्या मागे हे कर, ते कर अशी भुणभुण लावाल, ओरडाल तेव्हा ही तुमची गोड पापी आणि हा खाऊ परत नाही ना करायला मिळणार! पुरस्कार कसा पटकन तुम्हाला परत करता येईल! निषेध म्हणून!!
आता मी जाते खेळायला. तेवढी सायकल द्या ना काढून प्लीज" !अणि ती खेळायला गेली सुद्धा..

आमच्या हिला म्हणालो, " उगाच काळजी वाटत होती पोरीची... स्पर्धात्मक युग... कसे होणार??वैगरे वैगरे.. आता कसलीच चिंता नाही! आपली कार्टी मोठी साहित्यिक वैगरे होणार.. लावतेस पैज" ?
पुर्णपणे काल्पनिक